जि. प. शाळा वांगी खुर्दमध्ये प्रवेशोत्सव नव्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : शालेय शिक्षणाचा नवा शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांगी खुर्द, ता. सिल्लोड येथे प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या १७विद्यार्थ्यांचे पंचायत समिती सिल्लोडचे सहाय्यक गटविकास अधिकारी आशिष मस्के यांच्या हस्ते टिळा लावून, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर फित कापून प्रवेशद्वारावर नव्या विद्यार्थ्यांचे आनंदमय वातावरणात स्वागत करण्यात आले. 

शाळेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला रंगीबेरंगी टोपी, मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, पेन्सिल, लंचबॉक्स, पाण्याची बाटली आणि बिस्कीट पुडा भेट देण्यात आला. यावेळी बोलताना मस्के म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उच्चशिक्षित असून दर्जेदार शिक्षण देतात. गावातील अनेक नागरिक इथेच शिकून मोठ्या पदावर पोहोचले आहेत. खाजगी शाळेच्या चकाकीला भुलून मुलांचे नुकसान करू नये. तिथे अनेकदा अल्पशिक्षित शिक्षक असतात. मुलांना आदर्श नागरिक घडवायचे असेल तर त्यांना जिल्हा परिषद शाळेत शिकवावे. त्यांनी पुढे सांगितले की, शासन जिल्हा परिषद शाळेत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट मोजे, शिष्यवृत्ती अशा सुविधा देत आहे. 

खाजगी शाळेत डोनेशन, वाहनभाडे, ट्युशनचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. तो आर्थिक ताण टाळून दर्जेदार शिक्षण हवे असेल तर पालकांनी जिल्हा परिषद शाळेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे शालेय व्यस्थापन समिती (मराठी) अध्यक्ष लक्ष्मणराव मुरकुटे, शालेय व्यस्थापन समिती (उर्दू ) अध्यक्ष अबरार शेख, उपाध्यक्ष रवी दांडगे, सदस्य- जावेद पठाण, राहुल जाधव, अशफाक शेख, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस. गाडेकर, जेष्ठ शिक्षिका पाटील मॅडम, बावसस्कर मॅडम, कू अवचार मॅडम, जेष्ठ शिक्षक ठाकूर, गोपाल ढगे, पठाण, जुनेद, झिनत बाजी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

नव्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रवेश उत्सवामुळे वांगी खुर्द गावात जिल्हा परिषद शाळेविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून अधिक पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश याच शाळेत करण्याचा निर्धार व्यक्त केला.